Friday 28 April 2017

हीच माझी कहाणी: भाग १


"दादर स्टेशन यायला अजून किती वेळ आहे?" मी माझ्या शेजारच्या प्रवाशाला विचारलं.

"साधारणतः १० मिनिटं" ते म्हणाले

"अच्छा Thank You काका"

हळूहळू लोकं आपआपल्या सामानासह दरवाज्याकडे रांग लावत होती. मी सुद्धा माझं सामान एकत्र केलं. गाडीचा वेग आता जरा मंदावला होता पण माझ्या हृदयातली धडधड मात्र वाढली होती. अर्थात नव्या शहरात चाललो आहे ह्याची उत्सुकता होतीच पण त्या सोबत थोडी भीतीही होती.
एक अनोळखी शहर, त्या शहरातील अनोळखी माणसं आणि त्याच शहराचा आता आपणही एक भाग होणार ह्याचं कुतुहल. 

मुंबई सारख्या ह्या मायानगरीत येणं हे माझ्यासाठी एक स्वप्नंच होतं जणू. जसं अनेकांचं असतं ना, अगदी तसंच.
आज मला ते पूर्ण होताना दिसत होतं. एक नवीन प्रवास सुरू होणार होता. आनंद तर होताच पण मनाला थोडी हूरहुर लागून राहिली होती. घरून निघताना आईचा तो हळवा झलेला चेहरा सारखा डोळ्यांसमोर येत होता. आईला असं एकटं सोडून इतकं लांब मी ह्या अगोदर कधीच आलो नव्हतो. येताना मलाही खूप त्रास झाला होता पण MBA चं शिक्षण मुंबईत घ्यायचं ही माझीच इच्छा होती आणि आईलाही ती मान्य होती. 

बघता बघता दादर स्टेशन आलं. सगळेच घाईघाईने उतरत होते. तसा मीही उतरलो. मुंबापुरीच्या जमिनीवर पाय ठेवताच माझं स्वागत झालं ते स्टेशनवरच्या अलोट गर्दीनं. खरं सांगतो, हे पाहून मी पूर्णपणे भांबावून गेलो होतो. ह्या आधी इतकी माणसं कधी पाहिली नव्हती. जिथे बघावं तिथे दिसत होती ती नुसती माणसे. कसाबसा त्यातनं वाट काढत मी स्टेशन बाहेर पोहोचलो अन् सुटकेचा निश्वास सोडला. आईला फोन करून कळवलं.

कधी एकदा रूमवर जातो असं झालं होतं. थकवा जाणवत होता. भूकही प्रचंड लागली होती. खायचं कुठे हा प्रश्न होता. इतक्यात समोरच एक वडा पावची गाडी दिसली. तिथेही चिकार गर्दी. ज्या मुंबईच्या वडा पावाबद्दल ऐकून होतो तो खाल्ला आणि मन अगदी तृप्त झाले.
मुंबईला येण्याआधीच मी फोनवरून PG म्हणून प्लाझा जवळ रूम घेतली होती.

" काका प्लाझाला कसं जायचं? "  मी एका माणसाला विचारलं.
" समोरून तुम्हाला Taxi मिळेल "
" ओके थँक्यू "

समोरच्या बाजूला लगेच Taxi मिळाली आणि त्यानं मला प्लाझाकडे सोडलं खर पण नेमका पत्ता शोधताना मात्र माझा गोंधळ उडाला होता. मला माझी बिल्डिंग काही सापडेना. मी माझ्या केअर टेकरना फोन लावला. तो काही लागला नाही.

अनेकांना पत्ता विचारला तर कुणी म्हणालं राईटला आहे, कुणी म्हणालं लेफ्ट. बिल्डिंग कुठल्या एका गल्लीत होती म्हणून लोकाना बहुतेक ती माहीत नसावी. माझी शोध मोहिम सुरुच होती.

जवळपास तास उलटून गेला. आता मात्र मला भिती वाटू लागली. आईची आठवण येत होती. काय करावं तेच समजत नव्हतं. हळूहळू काळोख होत होता. मी हताश होऊन एकटाच रस्त्याच्या कडेला बसलो होतो. मी आणि माझं सामान. ह्या अनोळखी शहरात जाणार तरी कुठे?
आजूबाजूला गाड्यांची तसंच माणसांची खूप वर्दळ होती पण तरीही एकटं वाटत होतं...

to be continued...

निनाद वाघ