Friday 30 June 2017

हीच माझी कहाणी: भाग ९


जुनंच आयुष्य नव्यानं जगणं.


जुने रस्ते नव्या वाटा
जुनेच किनारे नव्या लाटा
जुन्या जखमा नवं दुखणं
जुनेच डोळे नवी स्वप्न
जुनी ठेच नव्यानं लागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी वस्तू नवी किंमत 
जुनाच खेळ नवी गंमत 
जुना झोपाळा नवे झोके
जुनंच घड्याळ नवे ठोके
जुना आशीर्वाद नव्यानं मागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी माणसं नवे छत्र
जुनीच अक्षरं नवी पत्र 
जुने पेच नवे प्रसंग 
जुन्याच अपेक्षा नवे भंग 
जुना स्वभाव नव्यानं वागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं..

माझ्या कविता ऐकून आजींनी माझं तोंड भरून कौतुक केलं. मलाही खूप बरं वाटलं. दोघे आम्ही खूप आनंदी होतो. गप्पांच्या आणि कवितेच्या नादात मी माझा फोन आत ठेवलाय हे लक्षातच आलं नाही. मी झोपायला गेलो तेव्हा फोन बघितला. त्यावर कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून १७ मिस्ड कॉल होते. मी चक्रावलो. कुणाचे असतील ? मी पुन्हा फोन लावला त्या नंबर वर तेव्हा फोन लागेना आणि त्या विचाराने मला झोप लागेना.

सकाळ झाली. मी अजूनही त्याच विचारात होतो की मला फोन करणारी व्यक्ती नेमकी कोण असेल? 
त्या नंबर वर मी पुन्हा फोन लावला. अजूनही लागला नाही. फोनच्या ॲपवर नंबर शोधला तरी सापडला नाही. कदाचित राँग नंबर असेल म्हणून मी विचार सोडून दिला.
बघता बघता मुंबईत येऊन मला दोन आठवडे झाले होते.आज पासून माझं कॉलेज सुरू होणार होतं. मी निघताना आजींचा आशीर्वाद घेतला अन् निघालो.

रिमझिम पाऊस पडत होता. कॉलेजचा परिसर छान हिरवागार होता. मी बिल्डिंगच्या आत शिरलो आणि माझा वर्ग शोधला. सगळेच नवे चेहरे होते. एक बाक रिकामा दिसला. तिथे जाऊन मी बसलो. 

आमचं इंडक्शन शेशन सुरू झालं. प्रत्येक जण आपली ओळख करून देत होते. मी ही दिली. पहिला दिवस असाच गेला. निघताना काही मुलं घोळक्यात उभी होती. नवी नवी मैत्री झालेली पण माझी नजर गेली ती एका मुलावर. तो एकटाच उभा होता. 
मी त्याच्या जवळ गेलो.

"हाय.. मी समीर"

"हाय"

"नाव काय रे तुझं?"

"रोहन.. रोहन दिक्षित"

मी हे नाव ऐकून चक्रावलो. हाच का आजींचा नातू? की फक्त नावात साम्य? मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं.


to be continued...



- निनाद वाघ



No comments:

Post a Comment