Friday 16 June 2017

हीच माझी कहाणी: भाग ८



कॉलेजमध्ये मार्कशीट देऊन मी पुन्हा घरी आलो. आजींशी गप्पा मारत बसलो. मी माझ्या वडिलांविषयी बोलणं टाळतो हे आजींना ही माहित होतं. त्यांनी मला ह्या विषयी एकदा विचारलं होतं पण नंतर पुन्हा कधीही हा विषय काढला नाही. कदाचित जसं मी त्यांना रोहनबद्दल विचारायचं थांबवलं होतं तसंच. 
आम्ही वेगळ्या विषयांवर गप्पा मारत होतो. जाताना बसमध्ये भेटलेल्या त्या आजोबांबद्दल सांगत होतो. गप्पांच्या ओघात मी त्यांना म्हटलं की मला लिहायला आवडतं. कविता करतो कधीकधी.

"काय सांगतोस? कविता ?? मला ऐकव की.."

"नाही हो.. येवढं काही चांगलं जमत नाही "

"असू दे. तरीही ऐकव"

"बरं.."

मी माझ्या कवितांची वही आणली.
आजी मी तुम्हाला 'माणूस' ही माझी कविता ऐकवतो. माणूस कसा असावा ह्या संदर्भातील ही कविता आहे.

माणूस

परिस्थितीशी झुंज देणारा 
असा माणूस व्हायला हवा..
आसवे गाळावे त्यांनीही 
पण मानसिकरीत्या खंबीर हवा..

प्रत्येक प्रश्नांना उत्तर नसले तरीही
शोधायचा त्यांने प्रयत्न करावा..
मनात झालेला विचारांचा गुंता
अगदी अलगद असा सोडवून घ्यावा..

राग आला कितीही तरी
मनात त्याच्या क्रोध नसावा..
कठीण समय आला जरी
चेहरा कायम प्रसन्न असावा..

परिस्थितीशी झुंज देणारा 
असा माणूस व्हायला हवा..
आसवे गाळावे त्यांनीही 
पण मानसिकरीत्या खंबीर हवा..

"वाह! छान! खरंच आवडली. खूप छान लिहिली आहेस"

"थँक्स आजी"

"अजून एखादी ऐकव ना. आता तर माझ्या अपेक्षा अजून वाढल्या आहेत"

"काहीही काय आजी. उगाच माझी मस्करी करताय का.."

"अरे खरंच मनापासून सांगतेय"

"बरं मग मी अजून एक कविता सादर करतो"


जुनंच आयुष्य नव्यानं जगणं.


जुने रस्ते नव्या वाटा
जुनेच किनारे नव्या लाटा
जुन्या जखमा नवं दुखणं
जुनेच डोळे नवी स्वप्न
जुनी ठेच नव्यानं लागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी वस्तू नवी किंमत 
जुनाच खेळ नवी गंमत 
जुना झोपाळा नवे झोके
जुनंच घड्याळ नवे ठोके
जुना आशीर्वाद नव्यानं मागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी माणसं नवे छत्र
जुनीच अक्षरं नवी पत्र 
जुने पेच नवे प्रसंग 
जुन्याच अपेक्षा नवे भंग 
जुना स्वभाव नव्यानं वागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं..

माझ्या कविता ऐकून आजींनी माझं तोंड भरून कौतुक केलं. मलाही खूप बरं वाटलं. दोघे आम्ही खूप आनंदी होतो. गप्पांच्या आणि कवितेच्या नादात मी माझा फोन आत ठेवलाय हे लक्षातच आलं नाही. मी झोपायला गेलो तेव्हा फोन बघितला. त्यावर कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून १७ मिस्ड कॉल होते. मी चक्रावलो. कुणाचे असतील ? मी पुन्हा फोन लावला त्या नंबर वर तेव्हा फोन लागेना आणि त्या विचाराने मला झोप लागेना.


to be continued...


- निनाद वाघ


No comments:

Post a Comment