Friday 26 May 2017

हीच माझी कहाणी: भाग ५


"आजी एक प्रश्न विचारू?"

"मला माहिती आहे तुला काय विचारायचं आहे ते. तुला वाटलं असेल की मला समजलं नाही पण सकाळपासून तू जरा अस्वस्थ आहेस हे दिसतंय मला. तुझ्या ह्या अस्वस्थेचं कारण काय त्याचा अंदाज आहे मला. तुला हाच प्रश्न पडला आहे ना की हा रोहन कोण आहे?"

"हो. म्हणजे काल तुम्ही म्हणालात की तुम्ही रोहनशी अशाच गप्पा मारायचा. पण मग हा रोहन कोण हे सांगितलं नाही."

"सांगते.."

"मी आणि रोहन अशी आमची टीम होती. आम्ही अशाच गप्पा मारायचो. मस्त नाटक सिनेमाला जायचो. फिरायचो. त्याला हे सगळं खूप आवडायचं आणि मलाही. रोहन दिक्षित म्हणजे माझा नातू. छान नातं होतं आमचं. मी ही छान रमायचे त्याच्या सोबत. पण मग त्या काळ्या दिवशी.."

रोहन बद्दल सांगताना आजी जरा भावूक झाल्या होत्या.

"२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सगळं कसं छान चाललं होतं. मी, माझे मिस्टर, मुलगा, सून आणि नातू रोहन. घर अगदी माणसांनी भरलेले असायचे. रोहन तेव्हा पाच वर्षांचा होता. चिमुकल्या पावलांनी घरभर हिंडायचा. बोबड्या आवाजात बोलायचा. आजी..आजी.. करत सारखा अवती भवती फिरायचा. त्याच्या मागे मागे धावताना माझी दमछाक व्हायची खरी पण गंमतही तितकीच यायची. वेळ कसा जायचा हे समजायचंही नाही. आम्ही दोघं खिडकीपाशी बसून गप्पा मारायचो. तो मला कार्टूनच्या गोष्टी सांगायचा तर मी ही त्याला बोध कथा सांगायचे. ते दिवसच वेगळे होते. त्याला कार्टून फिल्मस् खूप आवडायच्या. मग आम्ही असंच बाहेर जायचो. फिल्म बघायचो. हॉटेलात खायचो. इथेच कट्ट्यावर येऊन बसायचो. ही जागा त्याच्या आवडीची होती आणि म्हणूनच माझीही"

आजी सांगता सांगता थांबल्या. त्यांच्या चष्म्यामागून आलेला तो अश्रूचा थेंब खूप काही सांगत होतं. त्यांचं त्यांच्या नातवावर किती प्रेम होतं हेच ह्यातून दिसत होतं.

"आजी मग आता रोहन कुठे असतो? नाही म्हणजे मी इथे आल्यापासून कधी दिसला नाही किंवा कुठला फोन आला नाही म्हणून विचारलं?"

"फोन आला नाही हे खरं आहे पण कधी येणारही नाही हेही तितकंच खरं आहे."

"का?"

"मला वाटतं उशीर खूप झाला आहे. आपल्याला निघायला हवं."

"पण आजी..."

"चल म्हटलं ना.."

सिनेमा ऐन रंगात यावा आणि तेव्हाच नेमकी वीज जावी. उत्कंठता शिगेला पोहोचावी आणि गोष्ट अर्धवट राहवी. तसंच काहीशी अवस्था माझी झाली होती. रोहन बाबत उत्कंठता ताणली गेली होती.
आम्ही घरी पोहोचलो. आजी फार काही बोलल्या नाहीत. आपल्या खोलीत शांत बसून होत्या. मीही त्यांना काही विचारायला गेलो नाही. त्या दुखावल्या होत्या हे जाणवत होतं. रोहनचा विषय काढून अजून मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता.
मी ही स्वतःशी ठरवलं की आता जो पर्यंत आजी रोहन बद्दल सांगत नाही तो पर्यंत आपण हा विषयच काढायचा नाही. 
दिवसभर आजी सोबत खूप छान वेळ गेला. आईला फोन केला. तिच्याशी दिवसभर घडलेली प्रत्येक गोष्ट शेयर केली. आजींबद्दल सांगत होतो. तिलाही बरं वाटलं ऐकून.
रात्र फार झाली होती . मी खोलीचा दिवा बंद केला. आजींच्या खोलीत डोकावलं तर त्या शांत झोपल्या होत्या. मग मीही झोपलो.
रोहनचा विषय संपला होता माझ्यासाठी पण प्रश्न अनुत्तरीत होताच. रोहन कुठे आहे? आजींचा मुलगा व सून ते कुठे असतील? आजोबा कुठे असतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी माणसं असूनही आजी अशा एकट्याच का? ह्या २० वर्षात असं काय बदललं?
हा विषय संपला असं म्हटलं खरं पण मन हे आपुले. विचार करायचे थोडीच थांबतंय. विचारचक्र सुरूच.


to be continued...

- निनाद वाघ




No comments:

Post a Comment