Friday 2 June 2017

हीच माझी कहाणी: भाग ६



रोहनचा विषय तात्पुरता तरी माझ्यासाठी संपला होता कारण त्यातच अडकून राहिलो तर मुंबईला येण्याचं माझं मूळ उद्दिष्ट बाजूला राहिलं असतं. आजींना हा विषय पुन्हा पुन्हा काढून त्रास द्यायचा नाही किंवा त्यांना दुःख होईल असं काहीही वागायचं नाही असं मी ठरवलं.
सकाळी मी माझं सगळं आवरून खोली बाहेर आलो तेव्हा तिथे आजी बसल्या होत्या. आनंदी दिसत होत्या. स्वतः मधे मग्न होत्या. गाणं गुणगुणत होत्या.

"Good Morning आजी"

"काय मग झोप झाली का छान?"

"हो आजी"

"बरं बस इथे. मी गरम कांदे पोहे केले आहेत ते आणते" असं म्हणत आजी किचनमध्ये गेल्या.

"लिंबू पिळून देऊ का?" आतून आवाज आला.

"हो चालेल"

"आणि खोबरं?"

"थोडं चालेल"

आजी आतून छान गरमागरम कांदे पोहे घेऊन आल्या.

"काय रे ते तुझ्या कॉलेजमध्ये तुला मार्कशीट का काय द्यायचा होत्या असं म्हणाला होतास. ते कधी जाणार आहेस?"

"अरे हो. मी विसरलो होतो. थँक्स आजी आठवण केल्याबद्दल. आजच जाऊन येतो."

"चालेल. लगेचच करून टाक. अशा महत्त्वाच्या कामात उगाच दिरंगाई नको."

"हो नक्की."

पोहे खाऊन झाल्यावर मी लगेचच कॉलेजला जायला निघालो. आजी म्हणाल्या होत्या की नाक्यावरच्या बस स्टॉपवर मला बस मिळेल.
मी बसची वाट बघत उभा होतो. गरमीचे दिवस असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या.

"वडाळ्याला जायला बस इथेच मिळेल ना?" मी शेजारच्या माणसाला विचारलं.

"होय"

इतक्यात मला बस येताना दिसली. मी त्यात चढलो आणि एक आजोबा बसले होते त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. अगदी साधी वेषभूषा होती त्यांची.डोळ्यांवर चष्मा. खांद्यावर कापडी पिशवी आणि हातात काही सुंदर चित्र होती.
मला राहावले नाही म्हणून मी सहज त्यांना म्हटले, “आजोबा, ही चित्र कुठून आणली? अप्रतिम आहेत!”
हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. मला म्हणाले, "बाळा ही मी स्वतः काढली आहेत."

मला आश्चर्याचा धक्का बसला.

"वाह! तुम्ही चित्रकार आहात ? "

"हो. म्हणजे अगदीच चित्रकार असं नाही पण हौस म्हणून काढतो."

"क्या बात है"

"तू विचारलं म्हणून सांगतो. लहानपणापासून आवड होती. जगातील प्रसिद्ध चित्रकार व्हायचे स्वप्नं पाहिले होते. परंतु चित्रकाराचे उत्पन्न फार कमी. घरच्या लोकांना ते पसंत नव्हते. त्यांचा विरोध होता. म्हणून इच्छा नसताना देखील इंजिनियर झालो. चांगली नोकरी मिळाली. पुढे लग्न झाले. संसार सुरू झाला. आयुष्याच्या चित्रात रंग भरताना माझी आवड मात्र मागे राहिली.
पैसे आले. चांगले आयुष्य मिळाले परंतु आनंद नाही मिळाला. आज मुलं परदेशी आहेत. सुखी आहेत. पत्नीचे निधन झाले. आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर काय मिळालं ह्या पेक्षा माझं स्वप्न अपूर्ण राहिले ह्या गोष्टीचे दुःख जास्त आहे. मनात खंत उरते रे. तुझे काही स्वप्न आहे का? जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वतःचे स्वप्न पूर्ण कर. जे आहे ते ह्या जन्मात. एखादी राहून गेलेली गोष्ट पुढच्या जन्मी करीन हे आपल्या अपयशाचे केलेले समर्थन आहे . लक्षात ठेव!"
त्यांच्या डोळ्यात पाणी होते. चष्म्या मागून येणारा तो अश्रूचा थेंब हृदयाला चटका लावणारा होता.
बस थांबली. ते उतरले . मी थक्क होऊन पाहत राहिलो…




to be continued...



- निनाद वाघ


No comments:

Post a Comment