Friday 9 June 2017

हीच माझी कहाणी: भाग ७



बस मधून उतरल्यावर समोरच कॉलेजची इमारत दिसली. इंटरनेट वर फोटो पाहिला होता खरा पण प्रत्यक्षात सुद्धा ती वास्तू तितकीच सुंदर होती.
खरंतर शिक्षणाची आवड मला अगदी लहानपणापासून होती. शाळेत असताना नेहमी चांगले मार्क्स असायचे. देवाच्या कृपेने हुशारही होतो. उच्च शिक्षण घेणं हे माझं स्वप्न होतं.
माझं बालपण हे खरंतर एका छोट्याशा खेड्यात गेलं. घरची परिस्थिती तशी बेताची होती पण आईने झेपेल तसं सगळं केलं. दिवस रात्र राबायची बिचारी. माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च तिने केला. ते कधीच थांबू दिलं नाही. आईने केलेल्या कष्टाची जाणीव मला होती. कॉलेजला जायला लागल्यावर मी सुद्धा एक छोटीशी नोकरी धरली. तिथेच गावातच. पगार काही फार नव्हता पण तेवढीच आईला मदत.
हळूहळू खर्च वाढू लागले. आईच्या ही अवाक्या बाहेर जात होतं सगळं. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच टेंशन दिसायचं मला. बाकी कसलंही सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग नाही ना घेता येत. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.
एकदा असंच मी तिला म्हटलं की आता पुढचं शिक्षण नको. त्याचा खर्च वाचेल आणि पूर्ण वेळ नोकरी करता येईल. तेव्हा आई खूप चिडली माझ्यावर आणि म्हणाली "जो पर्यंत तुझी आई जिवंत आहे तो पर्यंत तरी तुला असं काहीही करायची गरज नाही. तुला वाटतं ना की पैशाची जुळवाजुळव करताना मला त्रास होतोय. तर हो..होतोय मला त्रास..पण जर तू शिक्षण सोडलं तर मला होणारा त्रास हा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. त्यामुळे पुन्हा कधी शिक्षण सोडण्याची भाषा करायची नाही."
दिवस सरत होते. आम्ही जगत होतो. माझ्या आईची स्वामींवर फार श्रद्धा होती. ती नेहमी म्हणायची की आपण कष्ट करत रहायचे. स्वामी आपल्याला ह्यातून नक्कीच बाहेर काढतील.
तिचा हाच विश्वास खरा ठरला. ऐके दिवशी मावशीचा फोन आमच्या शेजारच्या घरी आला. तिने आईला सांगितलं की कुठलीतरी जुनी जमीन होती म्हणे वडिलांची त्यांच्या. कित्येक वर्ष अशीच होती. ती विकली गेली ३० लाख रुपयांना आणि त्यातून आलेले पैसे तिघं भावंडं वाटून घेणार. आईच्या वाटेला १० लाख रूपये आले.
आमची परिस्थिती बदलत गेली. आईचा ताण कितीतरी कमी झाला. मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तरा नशीब सुद्धा आपलं साथ देतं ह्यावर माझा विश्वास बसला.
हे सगळं सुरू असताना माझं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं आणि मुंबईच्या कॉलेजात MBA करायचं मी ठरवलं.


आपलं नशीब आपल्या हाती
दोष इतरांना देऊ नका..
आपण घडवू तसंच घडेल आयुष्य
रोष इतरांवर काढू नका..


आमच्या घरात तशी अजून एक व्यक्ती सुद्धा रहायची. सांगायला विसरलो. माझे वडील. पण त्यांच्या बद्दल न बोललेलं बरं..

to be continued...


- निनाद वाघ



No comments:

Post a Comment